29 Aug 2010

श्रीगणेशा..!!

श्रीगणेशा..!!


नमन करतो श्री गणेशा, वक्रतुंडा रे परेशा
लेखना प्रारंभ करतो, तरल शब्दा दे परेशा

शक्य करसी तू अशक्या, गम्यता देसी अगम्या
लक्ष अपराधास माझ्या, तूच पोटी घे परेशा

तू गजानन निर्विकल्पा, फेड माझ्या तू विकल्पा
वेल कवितेची चढू दे, वृक्ष तू व्हावे परेशा

तूच माझा सोयरा रे, पाठराखा तू सखा रे
तूच माझा भाव भोळा, मधुरसे गाणे परेशा

अभय कविता देखणी तू, वृत्त्त तू, स्वरशब्द तू रे
अंत्ययमका संग दे ते यमक तू माझे परेशा

                                         गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
(वृत्त – मात्रावृत्त)

गगनांबरी तिरंगा ....!!






गगनावरी तिरंगा ....!!


गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

साथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना
धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना
कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी
आता अभय मनाच्या धुंदीस या जपावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

                                       गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
(वृत्त : आनंदकंद)
..........................................................

मा. प्रमोद देव यांनी या गीताला अतिशय उत्तम चाल दिली.
ऐका तर.....

*     *     *

माय मराठीचे श्लोक...!!

माय मराठीचे श्लोक...!!
       
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा 
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                                   गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
(वृत्त – भुजंगप्रयात)

बळीराजाचे ध्यान ....!!

बळीराजाचे ध्यान ....!!

सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥

कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥

तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥

कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥

नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥

आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥

राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥

                                   गंगाधर मुटे

............ **.............. **.............**.......

सजणीचे रूप ...!!

सजणीचे रूप ...!!

रुपये पाहता लोचनी। सुखी झाली ती साजणी ॥१॥
म्हणे व्यापारी बरवा। म्हणे पगारी बरवा ॥२॥
शेती बागा त्याचे घरी। परी नको शेतकरी ॥३॥
ऐसे सजणीचे रूप। पदोपदी दिसे खूप ॥४॥
अभय म्हणे कास्तकारा। डोहामधी डुबक्या मारा ॥५॥

                                            गंगाधर मुटे

............ **.............. **.............**.......

हताश औदुंबर

हताश औदुंबर


ऐल तीरावर लाल शिरावर,लुकलुकता घेऊन
निळा पांढरा थवा चालला, रजःकण पांघरून
ढोलं-चौघडे, बोल बडबडे, खाकी गर्दी पुढे
सरावल्यांची पोपटपंची, गगन भेदुनी उडे

पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून
बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेऊन
अभागीनीचे कुंकूम पुसता, अचेतन ती पडे
पोशिंद्याचा बाळ भुकेला, तिच्या उराशी दडे

दोन तीरांना अभये धारा, विलगे निरंतर
पाने गाळुनी मुंडण करितो, हताश औदुंबर

                                          गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
("त्या" सर्व हजारो स्वर्गिय शेतकर्‍यांना
भावपुर्ण श्रद्दांजलीसह सादर समर्पित.)

.....................................................

.आईचं छप्पर.

.आईचं छप्पर.


कडाक्यात भांडतात
मेघ गडगड करून
भरून येते नभाला
अश्रू ढाळते वरूण ...!


अश्रू बनती गारा
वादळ तांडव करी
गारठल्या हवेसवे
विजेस हिंव भरी ...!


हिंव भरल्या विजेस
ताप चढवी गारा
तिला पांघराया
छप्पर नेतो वारा ...!


छप्पर उडल्या संसारात
ब्रह्मपुत्रा वाहते
तेल मिरची शिदकुट
पाण्यावरती पोहते ....!


पोहतांना पुस्तक वही
सरस्वती भिजते
माती करून जीवाची
चूल उल्हे निजते ....!


गरजत्या पावसात
चोळी झबले न्हाती
पदराखाली लेकरं
कवटाळती छाती ....!


                      गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......

( शिदकूट = मोजक्या काळासाठी पुरेल एवढी अन्नसामग्री)
( उल्हा = एकप्रकारची कच्च्या मातीची चुलच पण लाकडा ऐवजी कोळशाचा जाळ घालतात.उल्हाचूल.)

औंदाचा पाऊस

     औंदाचा पाऊस 

सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी
कोमात गेलं शिवार सारं, व्वा रे पाऊसपाणी ......!!


उन्हाळवाही-जांभूळवाही, शेती केली सुधारीत
बी-बेनं खत-दवाई, बीटी आणली उधारीत
नवं ज्ञान, नवं तंत्र, उदीम केला पुरा
पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा
खंगून गेली कपाशी, बोंड बोरावाणी ......!!


बेनारचा बाबू म्हणे कापूस नाही बरा
औंदा पेर सायबीन, बरकत येईन घरा
नाही उतारा तिलेबी, खासर उलार होते
रोग झाला गेरवा,एकरी दीड पोते
बिनपाणी हजामत, चीत चारखानी ......!!


सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे
अक्कल नाही तूले म्हून, भरले नाही दाणे
विहिरीत नाही पाझर, नयनी मात्र झरे
किसाना परीस कईपट, चिमण्या-पाखरं बरे
भकास झालं गावकूस, दिशा वंगळवाणी .....!!


                      गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
ढोबळमानाने शब्दार्थ :
पोटलोड = जमिनीतील अपुऱ्या ओलाव्यामुळे
दाण्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच शेंग पक्व होणे.
पराटी = पऱ्हांटी,कपाशीचे झाड.
बेनार = कृषी विषयक सल्ला देणारा शासकीय विभाग
खासर = बंडी, शेतीमाल वाहतुकीसाठी बैल
जुंपून वापरावयाचे साधन.
गेरवा = तांबेरा नावाचा रोग, झाडाची पूर्ण वाढ न
होता पिक कापणीला येते.
खासर उलार होणे = लाक्षणिक अर्थाने व्यवस्था
कोलमडणे. घडी विस्कटणे
.....................................................

नाते ऋणानुबंधाचे....!!

नाते ऋणानुबंधाचे..


ऋणानुबंधाचे...... ते हक्क सांगताना
पुलकित होय अवनी, ओहळ रांगताना...!


का उठती रोमांच? अलगद स्पर्श होता
ते गगनही उल्हसित, मेघ पांगताना ....!


गम्य कसे गवसते? तृष्णा कोण जाणे
शहारते पाकळी, पतंग खेळताना ......!


अस्पर्श रक्षिलेला, जपून जतन ठेवा
ते हृदयही कंपित, तार छेडताना ......!


स्पर्श उत्कटतेचे, सख्यांस बळ देते
तन्मय ती तनूही, स्वरूप चाळताना...!


फेकुनी दूर अभये, शाल काळोखाची
रजनी लेत लाली, भानू उगवताना...!


                                   गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......

हवी कशाला मग तलवार ?

हवी कशाला मग तलवार ?


मकरंदाहुनि मधुर तरीही
शर शब्दांचे धारदार
तळपत असता जिव्हा करारी
हवी कशाला मग तलवार ?......!!


शब्दच असती कवच कुंडले
शब्दच चिलखत होती
शब्दच होती आयुधे ऐसी
नभास भेदुनि जाती
शब्द खड्ग अन् शब्द ढालही
परतवती ते हरेक वार.......!!


नवनीताहून मऊ मुलायम
कधी कणखर वज्रे
आसवांनी भिजती पापण्या
कधी खळखळ हसरे
हीनदीनांचे सांत्वन करिती
गाजविती दरबार....!!    


भुंग्यासम शब्दांची गुणगूण 
कधी व्याघ्राची डरकाळी 
शब्द फटाके, शब्द फुलझडी 
कधी नीरवता पाळी 
जोषालागी साथ निरंतर 
कधी विद्रोही फूत्कार ....!!  


सृजनशीलता-करुणा-ममता 
संयम विभूषित वस्त्रे 
हजरजबाबी, तलम,मधाळही 
परि कधी निर्भीड अस्त्रे 
पांग फेडण्या भूचे अभये 
तळहातावर शिर शतवार ...!!


                           गंगाधर मुटे
............ **.............. **............

रे जाग यौवना रे....!!

रे जाग यौवना रे....!!


रे जाग यौवना रे, ही साद मायभूची
आव्हान पेलुनीया, दे आस रे उद्याची
रे जाग यौवना रे ... ॥धृ०॥


झटकून मळभटाला, चैतन्य खळखळावे
भटकून आसमंती, हे रक्त सळसळावे
तारुण्य तेच जाणा, जे धडपडे सदाची
रे जाग यौवना रे ... ॥१॥


आता कवेत घे तू, अश्रांत सागराला
कापून लाट-धारा, तू खोल जा तळाला
रोवून दे निशाणा, ती खूण यौवनाची
रे जाग यौवना रे ... ॥२॥


आकाश अंथरोनी, तार्‍यास घे उशाला
बाहूत सूर्यचंदा, पाताळ पायशाला
विश्वा प्रकाश दे तू, तू ज्योत शारदेची
रे जाग यौवना रे ... ॥३॥


तू वीर मायभूचा, बलसागराप्रमाणे
यत्‍नास दे उजाळा, युक्ती-बळा-श्रमाने
अभये महान शक्ती, हो शान भारताची
रे जाग यौवना रे ... ॥४॥


                      गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
(वृत्त : आनंदकंद)       

शेतकरी मर्दानी

शेतकरी मर्दानी...!


काठी न घोंगडं घेऊ द्या की रं,
मलाबी रस्त्यावर येऊ द्या की .......!

या सरकारला आलीया मस्ती
कसे चाकर मानेवर बसती
ही विलासी ऐद्यांची वस्ती
लावती घामाला किंमत सस्ती
त्वेषाने अंबर चिरू द्या की रं ......!

ही सान-सान शेतकरी पोरं
ह्यांच्या बाहूत महाबली जोर
वाघा-छाव्यांची यांची ऊरं
घेती लढ्याची खांदी धुरं,
हातात रूमनं घेऊ द्या की रं ......!

हे फौलादी शेतकरी वीरं,
तळहातात यांचे शिरं,
लढायला होती म्होरं
मग येई सुखाची भोरं
धरणीचं पांग फेडू द्या की रं ......!

ही विक्राळ शेतकरी राणी
नाही गाणार रडकी गाणी
ही महामाया वीरांगनी
अभय गर्जेल शूर मर्दानी
उषेला बांग देऊ द्या की रं ......!

                          गंगाधर मुटे
............ **.............. **............

बायोडाटा..!!

बायोडाटा..!!


जीवाचा
आटापिटा
हाच त्यांचा
बायोडाटा  .....॥१॥


चोचीत मिळण्या
तृणवत काडी
फ़िरवित पंख
रान पछाडी  .....॥२॥

तृणकाड्यांची
गुंफ़ण करुनी
खोपा विणला
लक्ष धरुनी  .....॥३॥


कोणती विद्या?
गुरू कोणता?
घरटे बांधणे
शिकवीत होता  .....॥४॥


कसे उडावे 
किती उडावे 
कसे उमजले 
कोणा ठावे  .....॥५॥  


करुनी फ़डफ़ड 
प्रयास करणे 
हव्यास धरणे 
निरंतर धरणे .....॥६॥  


गवसून घेतो 
स्वयेच वाटा 
तोच त्यांचा 
बायोडाटा  .....॥७॥ 


              गंगाधर मुटे
............ **..........

अंगावरती पाजेचिना

अंगावरती पाजेचिना....!!


इभ्रतीला झाकेचिना, तिला चोळी का म्हणावे?
भुकेल्याला लाभेचिना, तिला पोळी का म्हणावे?

वास्तवाला चितारेना, तिला शाई का म्हणावे?
अंगावरती पाजेचिना, तिला आई का म्हणावे?

श्रमाविना पैदासते, तिला वृद्धी का म्हणावे?
पीडितांना कुस्कारते, तिला बुद्धी का म्हणावे?

अस्सलाची विटंबना, तिला नक्कल का म्हणावे?
बुरशीवाणी परजीवी, तिला अक्कल का म्हणावे?

विवेकाला स्मरेचिना, तिला सुज्ञ का म्हणावे?
तारतम्य हुंगेचिना, तिला तज्ज्ञ का म्हणावे?

अभयाने बोलेचिना, तिला वाणी का म्हणावे?
अंतरात्मा हालेचिना, तिला ज्ञानी का म्हणावे?

                                                गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......

माणूस

माणूस 


अरे माणूस माणूस
जसा निर्ढावला कोल्हा
धूर्त कसा लबाडीने
रोज पेटवितो चुल्हा ......!


अरे माणूस माणूस
जसा बक समाधिस्थ
मिष साधूचे घेवूनी
करी सावजाशी फस्त .....!


अरे माणूस माणूस
जसं सरड्याचं अंग
वेळ तशी खेळे संधी
बदली चामडीचे रंग ......!


अरे माणूस माणूस
जसा श्वान पोळी खाया
झगडितो आप्तियांशी
नाही दया, नाही माया......!


अरे माणूस माणूस जसा 
इंगळीचा चावं 
एक बोल जिभलीचा 
देई कलिजाला घाव ......!  


अरे माणूस माणूस 
जसा कुंभाराचा खर 
फुकामधी ओझे वाही 
वर चाबुकाचा मार ......!  


अरे माणूस माणूस 
कसं निसर्गाचं देणं? 
गुण श्वापदाचे अभये 
नाही मानवाचं लेणं ......!


                      गंगाधर मुटे
............ **.............. **........

तू तसा - मी असा

तू तसा - मी असा


नाकीतोंडी माश्या गेल्यात, मी मात्र मख्ख
माझी अवस्था पाहून, तू खिदळलास चक्क

मोगल आले तेव्हा, मी अगदी स्वस्थ
लाळ घोटायचा खुलेआम, तू मात्र मस्त

इंग्रज आले तेव्हा, मी झोपलो गाढ
चापलुशित तुझ्या, बरीच झाली वाढ

डोंगरमाथ्याहून शिवाजी, घालत होता साद
मला फ़ुरसत नव्हती, तुला फ़ितुरीचा नाद

फ़ाशी चढताना भगतसिंग, स्वप्न पाहत होता
मला प्रपंचाची ओढ, तू टाळ्या वाजवीत होता

आता उजाडेल,मग उजाडेल
"अभय" कधीतरी उजाडेल?
की.....
तू तसा-मी असा,
म्हणून उजाडणेही बुजाडेल?

                                          गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......

नंदनवन फ़ुलले ...!!

नंदनवन फ़ुलले ...!!


वृद्धतरूच्या पारावरती,
झोके घेत झुलले
तरूघरी नंदनवन फ़ुलले

रम्यकोवळी रविकिरणे ती
कुणी अप्सरा खिदळत होती
मेघही हसती उडता उडता
गरजणे भुलले

भूक कोवळी घेऊन पाठी
स्वप्न उद्याचे कुणी शोधिती
भिरभीर भिरभीर उडती पतंगे
पंखही खुलले

पक्षी बोलती खोप्यामधुनी
मधमाश्यांशी हितगुज करूनी
वल्ली नाचल्या धुंद होऊनी
देठ थरथरले

गाय,खार अन् मनीम्याऊ ती
खेळ खेळती लपती छपती
चित्रकार तो तद्रूप झाला
रंगही स्फ़ुरले

चैतन्याचे अभय तरंग
वृद्ध तरूही झाला दंग
खोडव्याला फ़ुटली पालवी
फ़ुले ही फ़ुलले

                         गंगाधर मुटे
............ **.............. **.............

मांसाहार जिंदाबाद ...!!

मांसाहार जिंदाबाद ...!!


सोने गं सोने, रांधल्या का तुने
बेडूकाच्या खुला
खेकड्याची आमटी
अन् गांडूळाच्या शेवया...!!


गोचिडाची खिचडी
टमगिर्‍याचं भरीत
डासाचा अर्क घे
घुबडाच्या तर्रीत
जरासा सुरवंट, थोडेसे ढेकूण
घे पुरणात भराया .....!!


गोमाश्यांचा लाडू कर
त्याला सरड्याचा रंग दे
उवा-टोळ पिळूनी
सापा-विंचवाचा पाक घे
उंदराची चटणी, पालीची सलाद
घे तोंडास लावाया ....!!

कोंबडी नी बकरी
निरुपद्रवी जनावर
तुझ्या जिभेचे चोचले
उठती त्यांच्या जीवावर
गरिबाला सुळी, शत्रूला अभय
का करीशी अन्याया?....!!  


                           गंगाधर मुटे
............ **.............. **.............

जरासे गार्‍हाणे

जरासे गार्‍हाणे 

कुठे नोंदावे गार्‍हाणे हत्तीने तुडवले तेव्हा
वार्‍याने उडवले आणि पावसाने बडवले तेव्हा ......!

आदर्शाच्या रेघा शिष्यांनीच पुसून टाकल्या
त्या महात्म्याला वारसाने रडवले तेव्हा ......!

त्यागुनी रणांगणाला पळपुटे जे पळाले
त्यांच्या पराक्रमाला कनकाने मढवले तेव्हा ......!

जीविताची राख ज्यांच्या, सिंहासने घडवताना
त्यांच्याच चामडीचे पायतणे चढवले तेव्हा ......!

बसवूनी खांद्यावर अभयाने आधार दिला,
तोच हितशत्रू ! कारस्थाने दडवले तेव्हा ......!

                                         गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......

शेतकरी गीत

* शेतकरी गीत *


ऊठ ऊठ शेतकरी बाळा, तोड रे पैंजणचाळा
भूमातेची साद तुला, रानगंध लेवी भाळा
उचलुनी देख फ़णा, मना... शोध रे कारणा ......!


ताई-दादा राबताती, पिकताती माणिकमोती
जसं कैवल्याचं लेणं, ओंब्या-कणसं झुलताती
तुझा बाप घाम गाळी, फुलोरते धरणी काळी
कोण करी सदावर्ते? चिंध्या का रे त्याच्या भाळी?
शोध हा तू न्यायपणा, मना... शोध रे कारणा ......!


तुझा बाप सांब भोळा, कष्टकरी मराठमोळा
घामदाम गिळण्यासाठी, घारी-गिद्ध होती गोळा
दूध-दही कोण प्याले? तुझ्या ताटी ताक आले
चातुर्याला हिरेमोती, श्रम मातीमोल झाले
ठेवुनिया ताठ कणा, मना... शोध रे कारणा ......!


आई करी शेण-गोठी, भात गहू भरती कोठी
दुरडीला सांजी नाही, झोपी जाते अर्धापोटी
भुईवरी घाम सांडी, कापुसबोंड कांडोकांडी
मलमली कोण ल्याले? तिची उघडीच मांडी
समजुनी घे धोरणा, मना... शोध रे कारणा ......!


कोण कसे बुडवीत गेले? हक्क कसे तुडवीत नेले?
स्वामी असुनिया का रे, पराधीन जिणे आले?
अंग कसे खंगत गेले? स्वप्न कसे भंगत गेले?
पोशिंदा तो जगताचा, कोणी कसे रंक केले?
काळी आई का बंधना? मना... अभय दे कारणा ......!


                                     गंगाधर मुटे
............ **.............. **.............**........

ढोबळमानाने शब्दार्थ-
ओंब्या-कणसं = गव्हाची ओंबी,ज्वारीचे कणीस
दुरडी = भाकरी ठेवायची बांबुपासून बनविलेली टोपली
सांजी = समृद्धी = बरकत (किंवा शीग = धान्याचे
माप भरून त्यावर येणारी निमुळती रास)
...........................................................

रे नववर्षा

रे नववर्षा 




रे नववर्षा ये नेमाने
वल्हवीत अंकुर नवजोमाने
एक कवडसा चैतन्याचा
जा फुलवीत ही उदास राने ....!

ना अस्त्राने वा शस्त्राने
उकलन व्हावी सद्भभावाने
मत्सर-हेका ना गर्जन-केका
बाहुबलीचे नको भुजाने .....!

दानवाने ना देवाने
राज्य करावे बळीराजाने
आत्मग्लानी क्लेश त्यजुनी
जगावा पोशिंदा सन्मानाने ...!

रे नववर्षा दे अभयाने
दे भरुनी दुरडी भगोणे
वित्तपातल्या लक्तरांना
भरव मुक्तीचे चार दाणे ...!
   

                         गंगाधर मुटे
............ **.............. **.............

श्री गणराया








श्री गणराया

कृपावंत व्हावे श्री गणराया
भूलचूक माझी हृदयी धराया ॥धृ॥

चिंतामणी तू चिन्मय देवा
अनुतापी मी, तू करुणा ठेवा
द्वारी उभा मी नाम स्मराया ॥१॥

भयमोचक तव मंगलदृष्टी
अनुदिन लाभो तारक वृष्टी
हा भवबंध पार कराया ॥२॥

अनुष्ठान हे तव पूजनाशी
क्षणभंगुर मी, तू अविनाशी
साह्य होई मज अभय तराया ॥३॥


                                गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......

पंढरीचा राया









.
पंढरीचा राया : अभंग


पंढरीच्या राया । प्रभू दीननाथा ॥

टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥

युगे किती उभा । एका विटेवरी ॥
येवुनी बाहेरी । पाहा जरा ॥२॥

बदलले जग । आणि माणसेही ॥
तशा देवताही । बदलल्या ॥३॥

कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥
सोन्याची हौस । देवालाही ॥४॥

त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥
आम्हा का रे पायी । बोलावतो ॥५॥

देव गरिबाचा । तू राहिला गरीब ॥
भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥

आम्हां का रे असा । गरिबीचा शाप ॥
असे काय पाप । आम्ही केले? ॥७॥

अभयाने देवा । करा नियोजन ॥
जेणे भक्तजन । सुखी होती ॥८॥


                     गंगाधर मुटे
............ **.............. **.............

शुभहस्ते पुजा

.
.
शुभहस्ते पुजा : अभंग



प्रथम पुजेला । लालदीवा मस्त ॥
सत्ताधारी हस्त । कशाला रे ॥१॥

त्यांचे शुभ हस्त । कसे सांगा देवा ॥
हरामाचा मेवा । चाखती ते ॥२॥

लबाड लंपट । तयांची जमात ॥
माखलेले हात । रक्ताने गा ॥३॥

पाय तुझे कैसे । नाही विटाळले ॥
मन किटाळले । कैसे नाही ॥४॥

म्हणा काही देवा । आहे साटेलोटे ॥
अभयास वाटे । शंका तशी ॥५॥

                          गंगाधर मुटे
............ **.............. **............

हे गणराज्य की धनराज्य?

हे गणराज्य की धनराज्य?


प्रजापतीही प्रगल्भ झाला, पक्व झाली जनशाही
मतपेटीतून गेंडा जन्मला, धन्य झाली गणशाही...!!


एका-एकुल्या 'व्होटा'साठी, थैली - थैली नोटा
कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा
कोणी करिती लांगूलचालन, कोणी लोटांगण जाती
भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती
सदाचाराचा मुडदा पडतो, मदांध उन्मत्तशाही...!!


डांबर खाती,सिमेंट खाती, जणू चरण्यासाठी सत्ता
क्षणाक्षणाला टनाटनाने, वाढवीत नेती धनमत्ता
किडूक-मिडूक दिल्या बिगर ना, कचेरी कार्यसिद्धा
उद्दामाला दिवस सुगीचे, सत्याच्या माथी गुद्दा
नेकी इमान पांचट झाले, भरात आली बलशाही ...!!


विषा कवळते प्रजा बिचारी, ना सुलतानाला चिंता
यौवन भटकती पोटपाण्या, नृपास नच ये न्युनता
अन्नावाचून बालक मरती, कुपोषित आदिवासी
स्विज्झर बँका तुडुंब भरती, भारतीय मुद्रा राशी
अतिरेकाला अभय देऊनी, सुस्त झोपली दंडशाही...!!

                                            गंगाधर मुटे
---------------------------------------------------