29 Aug 2010

आंब्याच्या झाडाले वांगे

आंब्याच्या झाडाले वांगे

माणसावाणी नीती सोडून वृक्ष वागत नाही
म्हणून आंब्याच्या झाडाले वांगे लागत नाही ....!

अवर्षण येवो किंवा सोसाट्याचे वादळ
बहर आणि मोहर कधी त्याचे थांबत नाही ....!

पाने देतो, फ़ळे देतो आणि देतो छाया
बदल्यामधी घूटभर पाणी मागत नाही ....!

कोकीळ येवो, माकड येवो किंवा येवो घुबड
फ़ांदीवरती बसू देतो, भेद मानत नाही ....!

मकानाले लाकूड देतो, सयपाकाले सरपण
कुर्‍हाडीले दांडा देतो, वैरी जाणत नाही ....!

सद्‍गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे
जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....!

                                        गंगाधर मुटे
.........................................................

No comments:

Post a Comment