29 Aug 2010

घट अमृताचा

                       घट अमृताचा


लपेटून चिंध्यांत घट अमृताचा, न देखे कुणीही, शिवेना कुणी
लपेटून चिंध्यांस रेशीमवस्त्रे, अशी होय गर्दी, हटेना कुणी

किती वाटले छान हे गाव तेव्हा, जरासा उडालो विमानातुनी
इथे मात्र मेले कुणीही दिसेना, तरी का तजेला दिसेना कुणी?

असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

समाजात या हिंस्र भाषा नसावी, नसो स्थान लाठी व काठीस त्या
परी या मुक्यांची कळे भाव-भाषा, असे ज्ञान सत्तेस दे ना कुणी

भरारीस उत्तुंग झेपावतो मी, कवी कल्पनेला ’अभय’ गाठतो
परी वास्तवाने घरंगळत येता, उरे एक भूमी दुजे ना कुणी

                                                                गंगाधर मुटे
...........................................................................
(वृत्त - सुमंदारमाला )
...........................................................................

2 comments:

  1. खूप खूप सुन्दर.

    क्वचित इतक्या छान कविता मिळतात वाचायला.

    आज मी जी पोस्ट लिहिली आहे त्यावर तुमचं मत द्यावं असा आग्रह आहे.

    ReplyDelete
  2. नाचिकेतजी,सावधानजी
    आभारी आहे.
    मुक्यांची भाषा या सत्ताधार्‍यांना कळत नाही म्हणुन मुक्या अहिंसेला एक दिवस हिंसक व्हावे लागते.
    कटू असलं तरी सत्य आहे.
    मुक्यांची भाषा या सत्ताधार्‍यांना कधीतरी कळेल अशी आशा करूया.

    ReplyDelete