Showing posts with label शेतकरी गीत. Show all posts
Showing posts with label शेतकरी गीत. Show all posts

29 Aug 2010

बळीराजाचे ध्यान ....!!

बळीराजाचे ध्यान ....!!

सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥

कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥

तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥

कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥

नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥

आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥

राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥

                                   गंगाधर मुटे

............ **.............. **.............**.......

सजणीचे रूप ...!!

सजणीचे रूप ...!!

रुपये पाहता लोचनी। सुखी झाली ती साजणी ॥१॥
म्हणे व्यापारी बरवा। म्हणे पगारी बरवा ॥२॥
शेती बागा त्याचे घरी। परी नको शेतकरी ॥३॥
ऐसे सजणीचे रूप। पदोपदी दिसे खूप ॥४॥
अभय म्हणे कास्तकारा। डोहामधी डुबक्या मारा ॥५॥

                                            गंगाधर मुटे

............ **.............. **.............**.......

हताश औदुंबर

हताश औदुंबर


ऐल तीरावर लाल शिरावर,लुकलुकता घेऊन
निळा पांढरा थवा चालला, रजःकण पांघरून
ढोलं-चौघडे, बोल बडबडे, खाकी गर्दी पुढे
सरावल्यांची पोपटपंची, गगन भेदुनी उडे

पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून
बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेऊन
अभागीनीचे कुंकूम पुसता, अचेतन ती पडे
पोशिंद्याचा बाळ भुकेला, तिच्या उराशी दडे

दोन तीरांना अभये धारा, विलगे निरंतर
पाने गाळुनी मुंडण करितो, हताश औदुंबर

                                          गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
("त्या" सर्व हजारो स्वर्गिय शेतकर्‍यांना
भावपुर्ण श्रद्दांजलीसह सादर समर्पित.)

.....................................................

औंदाचा पाऊस

     औंदाचा पाऊस 

सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी
कोमात गेलं शिवार सारं, व्वा रे पाऊसपाणी ......!!


उन्हाळवाही-जांभूळवाही, शेती केली सुधारीत
बी-बेनं खत-दवाई, बीटी आणली उधारीत
नवं ज्ञान, नवं तंत्र, उदीम केला पुरा
पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा
खंगून गेली कपाशी, बोंड बोरावाणी ......!!


बेनारचा बाबू म्हणे कापूस नाही बरा
औंदा पेर सायबीन, बरकत येईन घरा
नाही उतारा तिलेबी, खासर उलार होते
रोग झाला गेरवा,एकरी दीड पोते
बिनपाणी हजामत, चीत चारखानी ......!!


सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे
अक्कल नाही तूले म्हून, भरले नाही दाणे
विहिरीत नाही पाझर, नयनी मात्र झरे
किसाना परीस कईपट, चिमण्या-पाखरं बरे
भकास झालं गावकूस, दिशा वंगळवाणी .....!!


                      गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
ढोबळमानाने शब्दार्थ :
पोटलोड = जमिनीतील अपुऱ्या ओलाव्यामुळे
दाण्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच शेंग पक्व होणे.
पराटी = पऱ्हांटी,कपाशीचे झाड.
बेनार = कृषी विषयक सल्ला देणारा शासकीय विभाग
खासर = बंडी, शेतीमाल वाहतुकीसाठी बैल
जुंपून वापरावयाचे साधन.
गेरवा = तांबेरा नावाचा रोग, झाडाची पूर्ण वाढ न
होता पिक कापणीला येते.
खासर उलार होणे = लाक्षणिक अर्थाने व्यवस्था
कोलमडणे. घडी विस्कटणे
.....................................................

शेतकरी गीत

* शेतकरी गीत *


ऊठ ऊठ शेतकरी बाळा, तोड रे पैंजणचाळा
भूमातेची साद तुला, रानगंध लेवी भाळा
उचलुनी देख फ़णा, मना... शोध रे कारणा ......!


ताई-दादा राबताती, पिकताती माणिकमोती
जसं कैवल्याचं लेणं, ओंब्या-कणसं झुलताती
तुझा बाप घाम गाळी, फुलोरते धरणी काळी
कोण करी सदावर्ते? चिंध्या का रे त्याच्या भाळी?
शोध हा तू न्यायपणा, मना... शोध रे कारणा ......!


तुझा बाप सांब भोळा, कष्टकरी मराठमोळा
घामदाम गिळण्यासाठी, घारी-गिद्ध होती गोळा
दूध-दही कोण प्याले? तुझ्या ताटी ताक आले
चातुर्याला हिरेमोती, श्रम मातीमोल झाले
ठेवुनिया ताठ कणा, मना... शोध रे कारणा ......!


आई करी शेण-गोठी, भात गहू भरती कोठी
दुरडीला सांजी नाही, झोपी जाते अर्धापोटी
भुईवरी घाम सांडी, कापुसबोंड कांडोकांडी
मलमली कोण ल्याले? तिची उघडीच मांडी
समजुनी घे धोरणा, मना... शोध रे कारणा ......!


कोण कसे बुडवीत गेले? हक्क कसे तुडवीत नेले?
स्वामी असुनिया का रे, पराधीन जिणे आले?
अंग कसे खंगत गेले? स्वप्न कसे भंगत गेले?
पोशिंदा तो जगताचा, कोणी कसे रंक केले?
काळी आई का बंधना? मना... अभय दे कारणा ......!


                                     गंगाधर मुटे
............ **.............. **.............**........

ढोबळमानाने शब्दार्थ-
ओंब्या-कणसं = गव्हाची ओंबी,ज्वारीचे कणीस
दुरडी = भाकरी ठेवायची बांबुपासून बनविलेली टोपली
सांजी = समृद्धी = बरकत (किंवा शीग = धान्याचे
माप भरून त्यावर येणारी निमुळती रास)
...........................................................

नाचू द्या गं मला : लावणी

नाचू द्या गं मला

गेली रोहिणी, मिरूग आला, आल्या पावसाच्या धारा
थेंब टपोरे चोळी भिजविती, पदर खेचतो वारा
कुलीनघरची जरी लेक मी, मला बंधात जखडू नका
जाऊ द्या गं मला पावसात अडवू नका
भिजू द्या गं मला पावसात अडवू नका
नाचू द्या गं मला पावसात अडवू नका ...॥धृ०॥

कोरस :- वेल कोवळी नवथर भेंडी, हिला पिंजर्‍यात दडवू नका
नाचू द्या गं हिला पावसात अडवू नका

कडकड करुनी विजा नाचती
गडगड गर्जन मेघ गर्जती
तरी जरा ना भिती वाटते
झंकार सुरांचे कानी दाटते
पाय थिरकण्या पुलकित करिती
देई टाळी मोर आणिक मयुरी ठुमका ..... ॥१॥

या जलधारा मस्ती करोनी
थेंब मारिती नेम धरोनी
सर्वांगाशी झोंबीत सारा
गुदगुली करितो अवखळ वारा
नसानसातुनी उधाण वाहे
गिरक्या घेते तरी ना थकते, मी नाजुका .....॥२॥

जाऊ एकली नकोच रानी
आई वदली हळूच कानी
घडे असे का मला न कळते
तनामनातुनी काय सळसळते
तरी खेळू द्या अभयाने मज
या धारांच्या पुढती सारा, अमृतघटही फ़िका ..॥३॥


                                     गंगाधर मुटे
...................................................................
(लावणी) 

बरं झाल देवा बाप्पा...!!

(१९८५ मध्ये मी लिहिलेली माझी पहिली कविता.)

बरं झाल देवा बाप्पा...!!


सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले
बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ....॥धृ.॥

कर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी
कर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी
तरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥१॥

कधी चालुनिया येते कहर अस्मानी
विपरीत शेतीधोरण कधी सुलतानी
कमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ....॥२॥

इंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले
शोषणाने शेतकरी खंगुनिया मेले
पोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले ....॥३॥

                                       गंगाधर मुटे
........................................................................
(पूर्वप्रकाशित- शेतकरी संघटक "ग्रामीण अनुभूती विशेषांक"१९८५)
..............................................................................................