29-Aug-2010

चाहूल नवःउषेची


चाहूल नवःउषेची

तरुणाईला उधाण यावं, चैतन्याला लाटा
गजबजाव्या चहूदिशांनी, संघर्षाच्या वाटा
घ्या मशाली, व्यापुनी टाका, इंच-इंच अंबरा
द्या ललकारी, शूर मर्दांनो, वैश्वी दिगंतरा....!

गोर्‍या नीतीला झेलत नेले, लाभ पोसले कुणी?
झकास जगले खुशालचेंडू, रक्तपिपासू कृमी
लायसन्स-कोटा,परमिट-नोटा, फास मांडीला ज्यांनी
घाम लुटुनी औद्योगिकतेचा, पवाडा गायला त्यांनी
उणे सबसीडीचा हिशेब मांडा, बांधा कटकंबरा
द्या ललकारी, शूर मर्दांनो, वैश्वी दिगंतरा....!

नेत्यांच्या गाली, तस्करी लाली,अफसर भासे गुंडे
डावे-उजवे, भ्रष्टाचारी, राजरोस राजबिंडे
मंदिर-मस्जिद,कमंडल-मंडल,मनुष्य वाटला ज्यांनी
निळा-भगवा,लाल-हिरवा, व्यापार थाटला त्यांनी
घ्या फैलावर त्यांना आता, चढवा फाळ नांगरा
द्या ललकारी, शूर मर्दांनो, वैश्वी दिगंतरा....!

काळ:रात्रीला तुडवीत आली, नवउषेची लाली
गळून पडती बंधन-पिंजरे, झुळूक मुक्तीची आली
फडफड कर पर मार भरारी, अदमास घे गगनाचा
नवी अंकुरे, नवी क्षितिजे, घे वेध उद्यांगनाचा
न्या दरवळत या गंध मातीचा, उंच-उंच अंबरा
द्या ललकारी, शूर मर्दांनो, वैश्वी दिगंतरा....!

                                               गंगाधर मुटे
............ **.............. **............. **..............

No comments:

Post a Comment