29 Aug 2010

कान पिळलेच नाही

कान पिळलेच नाही

उपदेशाने कान कसे पिळलेच नाही
माझे बहिरेपण त्याला कळलेच नाही

निग्रहाचे धडे दिले विपरीत दशेने
पानगळीतही मग पान गळलेच नाही

वेदनांचा काढा मग गटागटा प्यालो
तेव्हापासून व्यथांनी छळलेच नाही

चिरंतन असती बोल संत साहित्याचे
अनीतीच्या शेकोटीत जळलेच नाही

श्रावणात घननिळे जरा पिघळले होते
पुन्हा त्यांचे थेंब कसे वळलेच नाही

जनसेवेचा प्रताप आणि ’अभय’ पुरेसे
शुभ्रकापड घाणीतही मळलेच नाही

                                 गंगाधर मुटे
...................................................
(वृत्त - मात्रावृत्त )
..................................................

1 comment: