29 Aug 2010

लकस-फ़कस

लकस-फ़कस

काहून बाप्पा रंगराव, लकस-फ़कस चालता
खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालता....!!

’सहकारात’ होते तेव्हा, काय तोरा व्हता
कौलारू खोपडं पाडून, इमले बांधत व्हता
कशी कमाई होते बाप्पा, भगवंताची माया
देवधरम सोडून जनता, पडे तुमच्या पाया
पद गेल्याच्यानं आता, गोमाश्या हाकलता....!!

म्हणा काही रंगराव, गणित तुमचं चुकलं
विरोधात बसले म्हून, खिसे भरणं हुकलं
बाकीच्यायनं थातुरमातुर, टोपीपालट केली
दोन पिढ्या बघा कशी, गरिबी हटून गेली
पब्लिकच्या भावनेसंगं, चेंडूवाणी खेलता ....!!

होयनोय उठसूठ, विमानवार्‍या करता
खुर्चीच्या लोभापायी, दिल्लीत पाणी भरता
जनतेचे प्रश्न जरा, अभयतेनं मांडा
मणका टाईट ठेवूनशान, खमठोकपणे भांडा
हायकमांडच्या गुरकावणीले थरथर हालता ...!!

                                         गंगाधर मुटे
................................................................
ढोबळमानाने शब्दार्थ:
लकस-फ़कस = बेडौल
मांजरपाठ = स्वस्त व जाड धोतर
................................................................

2 comments:

  1. जनतेचा पाठिंबा असेल
    त्याला हायाकमाडचे भयं नसेल
    अशी स्थिती जेव्हां येईल
    तोच खरा सुदिन मानावा

    ReplyDelete
  2. कृष्णकुमारजी, आभारी आहे.

    ReplyDelete